ब्रोन्कायटिस काय आहे ?
ब्रॉन्कायटीस ही एक फुफ्फुसाची सामान्य स्थिती आहे ज्यामध्ये ब्रोन्कियल नलिकांमध्ये सूज येते. या नलिका फुप्फुसातून हवा आत आणि बाहेर नेत असतात आणि त्या फुगल्यामुळे श्वास घेण्यात त्रास होतो कारण हवेचा मार्ग संकुचित होतो. ब्रॉन्कायटीसमध्ये खोकला सामान्यत: घट्ट कफ च्या उत्पादनाशी संबंधित असतो. ब्रॉन्कायटीस हा अक्यूट किंवा दीर्घकालीन( क्रोनिक) असू शकतो.
त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ब्रॉन्कायटीसचे लक्षणे हे त्याच्या स्टेजनुसार भिन्न असतात. अक्यूट आणि दीर्घकालीन ब्रॉन्कायटीसमध्ये काही लक्षणे समान असली, तरी काही विशिष्ट लक्षणे क्रोनिक अवस्थेत नोंदवली जाऊ शकतात.
सामान्यीकृत लक्षणे:
- छातीत घट्टपणा आणि दम लागणे.
- थोडा ताप आणि थंडी.
- स्पष्ट, हिरव्या किंवा फिकट पिवळ्या रंगाचा कफ आणि खोकला आणि कधीकधी कफसह रक्त निघणे.
अक्यूट ब्रॉन्कायटीस:
बहुतेक लक्षणे जरी आठवड्याच्या आत बरी होतात पण खोकला अधिक काळ टिकू शकतो.
क्रोनिक ब्रॉन्कायटीस:
- सतत खोकल्याचे दौरे पडणे.
- खोकला सौम्य असू शकतो किंवा तो वाढू शकतो.
- किमान तीन महिने टिकतो.
ब्रॉन्काइटिसचे मुख्य कारणं काय आहेत?
इन्फ्लूएंजा व्हायरस सारखे सामान्य व्हायरस ज्यामुळे सर्दी आणि फ्लू होत असते, ब्रोन्काइटिस साठी देखील जबाबदार असतात. पण, क्रोनिक ब्रॉन्कायटीस गॅस्ट्रिक रीफ्लक्स, फुफ्फुसांना त्रासदायक गोष्टींच्या संपर्कात येणे आणि घरामधे किंवा कामाच्या ठिकाणी रसायनांमुळे होणारे परिणाम, कमी प्रतिकारशक्ती किंवा धूम्रपाना मुळे होऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
ब्रॉन्काइटिस एखाद्या साध्या सर्दीपासून वेगळा आहे हे ओळखणे कठीण होऊ शकते, विशेषकरून प्रारंभिक अवस्थेत. निदान करण्यासाठी सामान्यपणे डॉक्टर खालील चाचण्यांचा वापर करतात:
- एलर्जी किंवा इतर आजारांच्या चिन्हे तपासणीसाठी थुंकेची चाचणी करणे.
- निमोनिया किंवा इतर आजार नाही हे निश्चित करण्यासाठी छातीचा एक्स-रे घेणे ज्यामुळे खोकल्याचे स्पष्ट कारण कळेल, विशेषत: धूम्रपान करणाऱ्यांमधे.
- फुफ्फुसांच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी पल्मोनरी फंक्शन चाचणी आणि, एम्फिसीमा आणि दम्या ची लक्षणे बघणे.
अक्यूट ब्रोन्कायटिस बहुतेक व्हायरसमुळे होत असल्यामुळे अँटीबायोटिक्स सुचवल्या नाही जात. बर्याचदा, रोग काही दिवसांत स्वतःच बरा होतो. पण, शांत झोपेसाठी डॉक्टर कफ सिरप किंवा सूज कमी करण्यासाठी आणि हवेचा मार्ग अरुंद मार्ग मोकळा करण्यासाठी औषध सुचवू शकतात. अस्थमा किंवा फुफ्फुसांच्या इतर आजारांसाठी देखील औषधं दिली जातात. श्वासोच्छवासाचे व्यायाम, ऑक्सिजन थेरेपी, धूम्रपान सोडणे, जास्त द्रवपदार्थ पिणे आणि स्टीम इनहेलेशन हे इतर महत्वाचे उपाय आहेत जे याची लक्षणे दूर करण्यात मदत करू शकतात. शिवाय खालील सावधगिरी बाळगली पाहिजे:
- बाहेर पडताना मास्क घालणे.
- घरात ह्युमिडिफायर वापरणे.
- प्रदूषक आणि इरिटंट्सपासून दूर राहणे.
- पुनरावृत्ती टाळण्यासाठी फ्लूची लस घेणे.