लहान मुलांमध्ये अस्थमा काय आहे?
अस्थमा हा एक दीर्घकालीन आजार आहे ज्यामधे खोकला, श्वासनलिकेत घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात. साधारणत: अस्थम्याच्या अर्ध्याअधिक तक्रारी ह्या लहान मुलांमध्ये आढळून येतात. लहान मुलांची श्वासनलिका ही अरुंद असल्यामुळे मोठया माणसांच्या तुलनेत त्यांना अस्थम्याची लागण लवकर होते. त्यामुळे मुलांमध्ये अस्थम्याचे निदान आणि उपचार लवकर होणे फार गरजेचे आहे. किशोरावस्थेत जाईपर्यंत बर्याच मुलांचा अस्थमा बरा होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
लहान मुले पाच वर्षाची होण्याआधीच अस्थम्याची लक्षणे त्यांच्यात दिसू लागतात. वरवर लक्षणे जरी अस्थम्याची वाटत असली तरी मुलाला नक्की अस्थम्याचा आजार आहे हे कधीकधी खात्रीदायकपणे सांगता येत नाही. वेगवेगळ्या मुलांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात, त्यातील सर्वसामान्य म्हणजे:
- सततचा खोकला.
- घरघर.
- सतत सर्दी होणे.
- छातीत घुसमट होणे आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे किंवा जलद श्वसन.
याची मुख्य कारणं काय आहेत?
अस्थम्याची प्रमुख कारणं:
- विविध प्रकारचे ॲलर्जन्स जसे की ॲनिमल डँडर, धूळ, परागकण आणि बुरशी.
- व्यायाम आणि समुद्रसपाटीपासून जास्त उंचावर असणे.
- थंड हवामान किंवा हवामानातील बदल.
- सर्दी आणि फ्लू सारखा संसर्ग.
- प्रदुषके आणि धूरासारख्या त्रासदायक गोष्टी.
ही लक्षणे सहसा सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा जास्त दिसून येतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
जन्माच्या वेळी श्वासाला त्रास झाला होता का? कुटुंबात कोणाला अस्थम्याचा त्रास आहे का इत्यादि गोष्टींची डॉक्टर सखोल चौकशी करतात. नंतर हृदय आणि फुफ्फुसांची संपूर्ण तपासणी केली जाते. डॉक्टरांकडून फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेची चाचणी सुद्धा करावयास सुचवली जाते ज्यामुळे फुफ्फुसाची हवा आत-बाहेर घेण्याची क्षमता तपासली जाते.
अस्थम्याचे उपचार हे दोन प्रकारे केले जातात:
- त्वरित आराम पडणे: अस्थम्याचा झटका आल्यास त्वरित आराम पडावा म्हणून हा उपचार केला जातो. झटका आल्यास त्वरित इन्हेलर्सचा वापर करण्यास डॉक्टरांकडून सुचवले जाते. खोकला आणि घरघर यावर लगेच आराम मिळावा हा ह्या उपचाराचा हेतु असतो.
- दीर्घ-काळ चालणारे उपचार म्हणजे बीटा अगोनीस्टस किंवा स्टेरॉईडसारखी श्वासनलिकेची सूज कमी करणारी आणि श्वासमार्ग मोकळा करणारी औषधं.
- अस्थम्याला कारणीभूत ठरणार्या गोष्टींपासून दूर राहून त्याचे निरीक्षण करण्यासही डॉक्टरांकडून सुचविले जाते. काही रुग्णांना ॲलर्जी शॉट्सदेखील दिले जातात.