दातांचा संसर्ग म्हणजे काय?
दातातील संक्रमण किंवा फोड म्हणजे दातांचा संसर्ग. हा दातांच्या मुळांपर्यंत पोहोचून त्यामध्ये पस संचय होतो. हा संसर्ग वेदनादायी असू शकतो आणि त्यासाठी दंतवैद्याची गरज पडू शकते. दातांभोवतालच्या अस्थिबंध आणि उतींना झालेल्या संसर्गास पीरिओडॉण्टायटीस म्हणतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
दाताच्या संसर्गाचे सर्वात स्पष्ट चिन्ह म्हणजे सतत होणारी दातदुखी, जी वाढल्याने हिरड्यांखालील लसीका ग्रंथींना सूज येते. दंत संसर्गाचे इतर लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- कोणत्याही गरम किंवा थंड वस्तूची संवेदनशीलता.
- ताप असल्याची भावना.
- चावताना अडचण येणे किंवा वेदना होणे.
- तोंडाचा घाण वास येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
दातांच्या अस्वच्छतेमुळे दातांना संसर्ग होतो. जिवाणूंपासून आम्ल तयार होतात आणि त्यांचे रूपांतर प्लेक आणि कॅरीज मध्ये होते, जे या संसर्गास कारणीभूत असतात. दातांच्या संसर्गाचे आणखी महत्वाचे कारण म्हणजे अधिक प्रमाणात गोड आणि साखरेच्या पदार्थांचे सेवन, ज्यामुळे जिवाणूंच्या वाढीस मदत होते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वरील चिन्हे आणि लक्षणे दिसल्यास सर्वात पहिले दंतवैद्याकडे जाऊन संसर्गाच्या कारणाचें निरीक्षण करून फोड असल्यास तो हिरड्यांच्या इतर भागांत पसरतो आहे का हे तपासणे. दंतवैद्य संसर्गाची वाढ आणि विस्तार निश्चित करण्यासाठी काही चाचण्या करण्यास सांगू शकतात. संसर्ग निश्चित करण्यासाठी पुढील काही सामान्य चाचण्या करण्यात येतात:
- एक्स-रे - संसर्गाचे ठिकाण शोधण्यासाठी काढला जातो.
- ओपीजी - याद्वारे तुमच्या सर्व दातांचे आणि जबड्याचे निरीक्षण करून संसर्गाचे प्रमाण निश्चित केले जाते.
सर्वात सामान्य आणि प्राथमिक काळजी म्हणजे दातांची निरोगी स्वच्छता ठेवणे होय. दंतवैद्य कोणताही संसर्ग किंवा प्लेक टाळण्यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश आणि गुळणा करण्याचा सल्ला देतात.
जर संसर्ग झाला असेल किंवा पसरत असेल तर अँटिबायोटिक्स सोबतच पुढील काही उपचार प्रक्रिया केल्या जातात:
- फोड कोरणे - जर फोड झाला असेल तर दंतवैद्य वेदनेपासून आराम मिळण्यासाठी फोड फोडतात आणि स्वच्छ करतात.
- रूट कॅनाल उपचार - जर संसर्ग हिरड्यांचा मूळापर्यंत पोहोचला असेल तर दंतवैद्य रूट कॅनाल उपचारांद्वारे साठलेला पस काढून टाकतात.
- परिणाम झालेला दात काढून टाकणे - जर रूट कॅनाल उपचारही संसर्गित दात वाचवण्यास पुरेसा नसेल तर शेवटचा उपाय म्हणून प्रभावित दात काढून टाकला जातो.
या प्रक्रियांसोबतच दंतवैद्य संसर्गाचा विस्तार थांबवण्यासाठी अँटिबायोटिक्सही सुचवतात.