व्हेरीकोज व्हेन्स म्हणजे काय?
रक्त साठल्याने किंवा साकळल्याने फुगलेल्या किंवा आकाराने वाढलेल्या रक्तवाहिन्यांना व्हेरीकोज व्हेन्स म्हणतात. त्वचेखालील या रक्तवाहिन्या स्पष्टपणे पाहिल्या जाऊ शकतात. या वळलेल्या, फुगलेल्या, निळ्या किंवा गडद जांभळ्या रंगाच्या दिसतात. सहसा, त्या पायात होतात, पण शरीराच्या इतर भागातही होऊ शकतात.
याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बहुतेक सर्व रुग्णांमधे व्हेरीकोज व्हेन्सची लक्षणे बर्याच काळापर्यंत दिसून येत नाहीत. सर्वसामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- पाय दुखणे.
- पायावर सूज येणे.
- पायात किंवा पोटरीमधे गोळे / पेटके येणे.
- पोटरीवर आणि मांड्यांवर हिरव्या रंगाच्या रक्तवाहिन्यांचे जाळे दिसणे.
- वेरीकोज रक्तवाहिन्या असलेल्या ठिकाणी खाज होणे.
- त्वचा कोरडी आणि खरखरीत होणे.
- त्वचा नाजूक होणे ज्यावर काही इजा झाल्यास ती लवकर बरी न होणे.
याची प्रमुख कारणं काय आहेत?
रक्तवाहिन्यांच्या भिंती आणि झडपा कमकुवत झाल्यामुळे तिथे रक्त साठून राहते त्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात, पिळवटल्या आणि गुंडाळल्या जातात त्यालाच व्हेरीकोज्ड असे म्हणतात. सहसा झडपा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनी रक्त शरीराच्या वरील बाजूला ढकलतात परंतु जेंव्हा त्या कमकुवत होतात तेंव्हा त्यांच्यातील रक्त साठून राहते ज्यामुळे व्हेरीकोज व्हेन्सची समस्या निर्माण होते.
धोकादायक घटक पुढीलप्रमाणे आहेत:
- बर्याच काळाकरता उभे राहणे उदा. पेंटर, बस/ट्रेन कंडक्टर्स, शिक्षक वगैरे
- स्त्रियांमध्ये हा धोका जास्त असतो.
- गरोदरपणा.
- स्थूलता.
- वृद्धत्व.
- व्हेरीकोज व्हेन्सचा कौटुंबिक पूर्वेतिहास.
- पेल्व्हिसमध्ये ट्यूमर किंवा रक्तवाहिन्यांमध्ये आधीच रक्ताची गुठळी असणे यासारख्या दुर्मिळ बाबी.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
पायामध्ये पुढील प्रकारचे काही बदल दिसत आहेत का हे पाहाण्यासाठी डॉक्टर तपासणी करतील
- त्वचेचा रंग.
- बरे झालेले किंवा न झालेले पायावरील फोड.
- त्वचा स्पर्शाला गरम लागणे.
- लालसरपणा
रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह तपासण्यासाठी किंवा रक्ताची गुठळी आहे का बघण्यासाठी डॉप्लर अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यात येतो. सहसा गरज भासत नाही पण झालेल्या निदानाची खात्री करून घेण्यासाठी अँजियोग्राम करण्यास सुचविले जाते.
उपचारसाठी पुढील गोष्टी केल्या जातात:
- कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज – यामुळे सूज कमी होते तसेच पायावर दाब दिल्याने रक्तप्रवाह हृदयाच्या दिशेने पाठविण्यासही मदत होते ज्यामुळे रक्त साठण्याची प्रक्रिया कमी होते.
- अॅब्लेशन थेरपी – रेडियो फ्रिक्वेन्सी अॅब्लेशन, लेझर अॅब्लेशनचा वापर करून व्हेरीकोज्ड रक्तवाहिन्या नष्ट करण्यात येतात.
- स्क्लेरोथेरापी – यामध्ये एखादा पदार्थ रक्तवाहिनीत इंजेक्ट केला जातो ज्यामुळे रक्तवाहिनीचा रक्तपुरवठा बंद होतो.
- शस्त्रक्रिया (फ्लेबेक्टोमी) – रक्तप्रवाहासाठी वेगळ्या रक्तवाहिन्या असल्यामुळे खराब झालेल्या रक्तवाहिन्या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकल्या जातात.
- गंभीर प्रकारात खराब रक्तवाहिन्यांचे लिगेशन आणि स्ट्रीपिंग केले जाते.
स्वत: घेता येण्यासारखी काळजी:
- जास्त काळासाठी उभे राहू नये.
- दिवसातून 3-4 वेळा पाय वरील दिशेने उंचावून ठेवावेत.
- पायाकडील भागावर येणारा दाब टाळण्यासाठी वजन कमी करावे.
- रक्तप्रवाहात सुधारणा येण्यासाठी शारीरिक हालचाली जास्त कराव्यात. चालणे किंवा पोहणे हे उत्तम पर्याय आहेत.
- एखादी जखम किंवा फोड झाला असल्यास त्याची योग्य काळजी घ्यावी
- त्वचा मॉइस्चराईज्ड ठेवावी. ती कोरडी होऊन तिला चिरा पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.