सारांश
आपले मूत्रपिंड म्हणजे शरिराला आतून स्वच्छ करणारे, विषारी व निरुपयोगी घाण बाहेर फेकणारे अवयव आहेत. मात्र हीच स्वच्छतेची क्रिया त्यावेळी अतिशय त्रासदायक होते जेव्हा एक किंवा दोन्ही मूत्रपिंडांमध्ये काही कडक खडे बनतात. मूत्रपिंडांतील खडे गंभीर नसले तरी वेदनादायी असतात. हा प्रकार स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. किडनी स्टोन अथवा मूत्र खडे हे छोट्या मोठ्या आकाराच्या दगडांप्रमाणे असतात. त्यांच्या आकार, नैसर्गिक घटक द्रव्य आणि रंगांमध्ये वैविध्य आढळते. काही खनिजांच्या एकाच ठिकाणी साचत जाण्यामुळे हे खडे निर्माण होतात. शरीरातील कॅलशियम, युरिक ऍसिड किंवा स्ट्रुव्हाईट या घटकांची मात्रा वाढल्यामुळे किंवा सिस्टीन ऍसिडच्या गळतीमुळे- सिस्टीनुरिया मुळे- ही साचण्याची प्रक्रिया घडते.
वारंवार लघवी लागणे, त्यातही प्रत्येकवेळी थोडीशीच लघवी होणे, लघवीचा रंग आणि वास बदलणे या दृश्य बदलांवरुन खडे तयार झाले आहेत हे कळू शकतं. सोबतच कमरेत मागच्या बाजूला, ओटीपोटात, मांडीच्या सांध्यात आणि आजूबाजूला वेदना जाणवतात. ऍसिड आणि खनिजांच्या वाढलेल्या पातळीसोबतच आणखी अन्य वैद्यकीय कारणंही या खड्यांच्या निर्मितीला कारणीभूत ठरू शकतात. जसे की हायपरपॅराथाईरॉयडीसम्, किडनीचे दुखणे, पचनसंस्थेचे विकार, लघवीच्या मार्गतले संसर्गदोष, ज्यामुळे मूत्र खडे निर्माण होण्याची शक्यता बळावते. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, संपूर्ण शारीरिक तपासणी, रक्त व लघवी तपासणी, क्ष-किरण तपासणी, अल्ट्रासोनोग्राफी आणि सी टी स्कॅन करून या खड्यांचे नीट अनुमान लावता येऊ शकते.
मुतखड्यांवर केले जाणारे उपाय त्यांच्या आकारावरून ठरतात. कधी केवळ लघवीमार्गे ते बाहेर निघून जाऊ शकतात, किंवा कधी ध्वनी लहरींचा मारा करून ते फोडले जाऊ शकतात, किंवा कधी शस्त्रक्रिया करून काढावे लागतात. मूत्र खडे होऊच नयेत यासाठी करता येण्यासारखे उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे, मीठ कमी खाणे आणि असे अन्नपदार्थ टाळणे की ज्यामुळे खनिज साचत जाण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. आजार उलटण्याची शक्यता जरी असली तरी अनुवंशिकता नसेल तर मूत्र खड्यांच्या संभाव्य चढउताराचे व कारणांचे पूर्वनिदान करणे चांगले असते. मूत्रपिंड खराब होणे, किंवा संसर्गदूषित होणे, लघवीचा मार्ग संसर्ग दूषित होणे, किडनी किंवा लघवीचा मार्ग अवरुद्ध होणे, लघवीतून रक्त येणे यासारख्या समस्या मूत्र खड्यांमुळे निर्माण होतात.