भूक न लागणे म्हणजे काय?
जेव्हा खाण्याची इच्छा कमी होते तेव्हा त्यास भूक न लागणे असे म्हणतात. ज्यांची भूक कमी होते त्यांना शेवटचे जेवण केल्यावर कित्येक तासांनंतरही भूक लागल्याचे जाणवत नाही तसेच त्यांना अन्नपदार्थ पाहताच किंवा त्यांचा विचार करताच आजारी व थकल्यासारखे देखील वाटू शकते. शारीरीक आणि मानसिक अशा दोन्ही परिस्थिती भूक कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतात. दीर्घकाळ अशीच परिस्थिती राहिल्यास सर्वसाधारणपणे ती एनोरेक्झिया नामक स्थितीची सूचना असते.
याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
भूक न लागण्याची लक्षणे अगदी स्पष्ट आहेत. अन्नाच्या बाबतीत तीव्र तिटकारा म्हणजेच नावडतेपणाची भावना असते ज्यामुळे जेवणाचा विचार केल्यास किंवा जेवण दिसल्यास मळमळू लागते तसेच भूक कमी होते व वजन कमी होते. अशावेळी काही लोक भूक नसताना देखील बळजबरीने स्वतःला जेवण्यासाठी प्रवृत्त करतात ज्यामुळे त्यांना जेवणानंतर उलट्या देखील होतात. भूक दीर्घकाळ मंदावल्यास चक्कर (भोवळ) आल्यासारखे, मन विचलित झाल्यासारखे व अस्वस्थ असल्यासारखे वाटू शकते तसेच छातीत जळजळणे, श्वास घेण्यात अडथळे येणे व तापमानातील बदल सहन न होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.
कारणे काय आहेत?
सततच्या किंवा दीर्घकालीन आजारपणामुळे भूक कमी होऊ शकते. मग तो तीव्र डोकेदुखी सारखा सामान्य आजार देखील असू शकतो किंवा कँसर सारखा गंभीर आजार असू शकतो. तीव्र आणि दीर्घकालीन असे दोन्ही आजार भूक मंदावण्यास कारणीभूत ठरू शकतात. आजार किंवा दुखापतीमुळे होणारी वेदनासुद्धा भूक कमी होण्यास कारण ठरू शकते. भूक न लागण्याची काही संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- तीव्र डोकेदुखी (मायग्रेन).
- दुखापतग्रस्त मज्जातंतू.
- शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदना.
- थकवा.
- गर्भावस्था (गरोदरपणा).
- हृदयविषयक समस्या.
- प्री-मेनस्ट्रुअल सिंड्रोम (मासिक धर्माशी निगडित आजार).
- सर्दी.
- दारू व नशेच्या पदार्थांचे (ड्रग्स) सेवन बंद करणे.
- काही विशिष्ट औषधांचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट).
- भीती, नैराश्य आणि ताणतणाव.
- एनोरेक्झिया नरव्होसा किंवा बुलीमिया.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
लक्षणांचा अभ्यास, व्यक्तीची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि शारीरिक चाचण्यांच्या आधारे प्राथमिक निदान केले जाते. यामुळे डॉक्टरांना आजाराच्या काही संभाव्य कारणांचे मूल्यांकन करण्यास मदत मिळते व त्यानुसार इतर चाचण्या सूचित करता येतात. थायरॉईड, एचआयव्ही, कर्करोग आणि इतर रोगांची शक्यता पडताळण्याकरिता रक्तचाचण्या सुचविल्या जाऊ शकतात. हृदयारोगाच्या निदानाकरिता इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी), पोटाचे सीटी-स्कॅन आणि गॅस्ट्रिक चाचण्या देखील सुचविल्या जाऊ शकतात.
आजाराच्या मूळ कारणाचा उपचार ही मुख्य पायरी असते. औषधे आणि इतर उपचारांच्या जोडीने डॉक्टर आवश्यकतेनुसार वेदनाशामक औषधेदेखील लिहून देऊ शकतात. जीवनशैलीत बदल जसे की व्यायाम, विश्रांती, संतुलित आहार तसेच समुपदेशनाचा सल्लाही दिला जाऊ शकतो. भूक वाढविण्यासाठी अन्नाच्या चवीत बदल करणे व भूक वाढविणारी उत्तेजके घेणे असे उपायदेखील आहेत.