अक्कलदाढ दुखणे म्हणजे काय?
सर्वात शेवटी येणाऱ्या तोंडातील मागील बाजूला असणाऱ्या दातास अक्कलदाढ असे म्हणतात. अक्कलदाढ सहसा तारुण्यात उशिरा किंवा विशीच्या सुरवातीला येते. एकूण चार अक्कलदाढी असतात, दोन जबड्याच्या वरील व दोन जबड्याच्या खालील बाजूस. पण काहींना कमी किंवा जास्त अक्कलदाढी येऊ शकतात तसेच काही लोकांना अक्कलदाढ नसते. हे काही घटकांवर अवलंबून असते जे अक्कलदाढ येण्यावर परिणाम करतात. अक्कलदाढीचे दुखणे हे विविध कारणांमुळे होऊ शकते, एकमेकांमध्ये घट्ट अडकून राहणे किंवा संसर्ग ही सामान्य कारणे आहेत.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
अक्कलदाढीच्या दुखण्याशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- स्टिस्टमुळे येणारी सूज.
- दाढीजवळील हिरड्यांमध्ये दाह व लालसरपणा.
- हिरडीतून पस येणे.
- दाढ किडणे.
- दुर्गंधी श्वास.
- ताप.
- गिळताना दुखणे.
- जबड्याखालील लसिका गाठी दुखणे व सुजणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
अक्कलदाढ दुखण्याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- जबड्यातील अपुऱ्या जागेमुळे दाढीच्या मार्गात अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे दाढ दुखू शकते.
- अव्यवस्थितपणे दाढ उगवल्याने दात स्वच्छ करताना अडचण होणे, दोन दातांमधल्या जागेत अन्नकण साचून राहिल्याने जिवाणूंची वाढ होऊन संसर्ग होणे व दात दुखणे.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
अक्कलदाढीत तीव्र वेदना होत असल्यास त्वरित दंतचिकित्सकांना भेटावे. दंतचिकित्सक तुमचे दात, तोंड आणि हिरड्यांची तपासणी करून वेदनेचे कारण शोधतात. सामान्यतः दात अधिक स्पष्ट दिसण्यासाठी त्यांचा एक्स-रे काढला जातो.
दातदुखीचा अचूक उपचार हा त्याचा कारणावर अवलंबून असतो पण दंतचिकित्सक पुढील काही सामान्य उपचार पर्याय सुचवू शकतात
- संसर्गाच्या उपचारासाठी अँटिबायोटिक्स.
- वेदनेपासून आराम मिळण्यासाठी औषधोपचार.
- अँटिसेप्टिक माऊथवॉश.
- इतर उपचारांचा परिणाम होत नसल्यास व वेदना सतत होत असल्यास शस्त्रक्रियेद्वारे दाढ काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.
- तीव्र संसर्गाच्या प्रकरणांमध्ये सूजेमधून पस काढून टाकणे हा देखील उपचाराचा भाग आहे.
अक्कलदाढीच्या दुखण्यावर दंतचिकित्सकांचा त्वरित सल्ला घेणे व तत्पर उपचार केल्याने जिवाणूंची वाढ रोखली जाते आणि संसर्गाचा प्रसार प्रतिबंधित होतो.