लाईम डिसीज म्हणजे काय?
लाईम डिसीज हा बोरीलिया बर्गडॉर्फरी नामक बॅक्टेरियामुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे ज्याचा प्रसार गोचीड चावल्यामुळे होतो. यामध्ये, बाधित त्वचेवर एक चट्टा उमटतो व तो पुढे गोलाकारात पसरत जातो. गोचीड चावणे हे तितकेसे धोकादायक नसते व वेळीच निदान केल्यास त्यावर सहज उपचार करता येतात.
याची प्रमुख लक्षणे काय आहेत?
- रॅश/चट्टे - लाईम डिसीजच्या प्रारंभिक काळात याला सामान्य रॅश/चट्टा समजून याकडे दुर्लक्ष केले जाते. रॅश किंवा 'इरिथेमा मायग्रन्स' सामान्यतः गोचीड चावल्यानंतर एक ते दोन आठवडयांनी दिसू लागतात. त्यांना खाज सुटत नाही किंवा वेदना होत नाही पण ते साधारणतः महिनाभर शरीरावर राहतात.
- इतर लक्षणे - रॅशेसच्या सोबतीला सांधेदुखी, ताप आणि थकवा इत्यादी लक्षणे दिसून येतात ज्यांपैकी बहुतेक लक्षणांकडे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते.
लाईम डिसीजच्या अधिक विकसित अवस्थेमध्ये लक्षणे आणखी जटिल होत जातात व चिंतेची बाब बनतात. अशीच काही लक्षणे खाली नमूद केली आहेत:
- खूप थकवा येणे.
- मान दुखणे किंवा अकडून येणे.
- ताप येणे.
- फेशियल पॅरालिसिस/पाल्सी (चेहरा लकवाग्रस्त होणे).
- हाता-पायांना खूप जास्त मुंग्या येणे (झिणझिण्या येणे).
- सतत ताप येणे.
लाईम डिसीजची लक्षणे जरी कायमस्वरूपी नसली तरी दुर्लक्ष केले गेल्यास ती अतिशय वेदनादायी ठरू शकतात आणि उपचार करणे कठीण झाल्याने आजार पसरू देखील शकतो ॲडव्हान्स स्टेजच्या लाईम डिसीजमध्ये दिसून येणारी काही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- न्यूरोलॉजिकल विकार.
- पाल्सीमध्ये वाढ होणे किंवा हात-पाय सुन्न होणे.
- संधिवात, ज्यामुळे सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
गोचीड चावल्याने प्रसारित होणारा बोरीलिया बर्गडॉर्फरी नामक बॅक्टेरिया लाईम डिसीज होण्यास कारणीभूत असतो. चावल्यानंतर, गोचीड शरीरात 'स्पिरोकेट्स' सोडते, जे रक्तप्रवाहात शिरल्यानंतर वर नमूद केलेली लाईम डिसीजची लक्षणे दिसू लागतात.
लाईम डिसीजचे निदान व उपचार कसे केले जातात?
एखाद्या व्यक्तीस गोचीड चावल्यानंतर एक ते दोन आठवड्यांत रॅश/चट्टे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. इरिथेमा मायग्रन्स हा विशिष्ट रॅश केवळ गोचीड चावल्यानेच होतो व त्याच्या गोल आकारामुळे तो 'बुल्स-आय बोर्ड'प्रमाणे दिसतो. लाईम डिसीजवर अँटीबायोटिक्सने सहज उपचार करता येतात.
लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने ॲडव्हान्स स्टेजमध्ये परावर्तित झालेल्या लाईम डिसीजचे खात्रीशीर निदान करण्यासाठी डॉक्टर ‘पॉलिमरेस चेन रिएक्शनची (पीसीआर)’ शिफारस करू शकतात.
लाईम डिसीज प्रारंभिक अवस्थेत असल्यास, उपचारासाठी डॉक्सीसायक्लीन, एमॉक्सिसिलीन किंवा सिफ्युरॉक्सिम एक्सिटीलसारख्या औषधांचा उपयोग केला जातो. हृदयरोगी किंवा न्यूरॉलॉजिकल स्थितीतील रुग्णांवर सामान्यतः पेनिसिलिन किंवा सिफट्रीएक्सॉनसारख्या अँटीबायोटिक्सच्या साहाय्याने उपचार केले जातात.