मल्टीपल मायलोमा म्हणजे काय?
मल्टीपल मायलोमा हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो शरीराच्या प्लाझमा पेशींमध्ये होतो. या पेशी सामान्यपणे अस्थिमज्जामध्ये आढळतात आणि प्रतिरक्षा प्रणालीचा भाग असतात. मल्टीपल मायलोमामुळे अस्थिमज्जामध्ये प्लाझमा पेशींचा संचय होतो आणि रक्त पेशींच्या उत्पादनांवर परिणाम होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मल्टीपल मायलोमाची नंतरच्या टप्प्यात विस्तृत चिन्हे आणि लक्षणे दिसू लागतात, ज्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत:
- सतत हाडांचे दुखणे.
- हाड कमकुवत होणे, परिणामी अगदी हलक्या प्रहारामुळे देखील फ्रॅक्चर होणे.
- ॲनिमिया.
- सतत संसर्ग होणे.
- रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढल्यामुळे पोटात दुखणे, खूप तहान लागणे , बद्धकोष्ठता आणि चक्कर येणे.
- मूत्रपिंडांची समस्या उद्भवल्यामुळे मूत्रपिंड खराब होते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
मल्टीपल मायलोमाचे अचूक कारण डॉक्टरांनी सांगितले किंवा त्याची पुष्टी केली नाही आहे, पण असे अनेक घटक आहेत जे मल्टीपल मायलोमाचा धोका वाढवितात. 35 वर्षापेक्षा जास्त वय, लठ्ठपणा, मल्टीपल मायलोमाचा कौटुंबिक इतिहास, पुरुष आणि आफ्रिकन अमेरिकन असणे यामुळे आजार होण्याची शक्यता वाढते.
ऑन्कोजीन्स आणि ट्यूमर सप्रेसर जीन्समधील असंतुलन हे एक सामान्य कारणं आहे. मानवी शरीरातील पेशींच्या वाढीसाठी ऑन्कोजीन्स जबाबदार असतात,ट्यूमर सप्रसेसर जीन्स योग्य वेळी पेशींची वाढ कमी करतात किंवा मारून टाकतात. अशा स्थितीत या जीन्समधील उत्परिवर्तनामुळे आणि खराब होण्यामुळे प्लाजमा पेशींची अनियंत्रित वाढ होऊ शकते, परिणामी मल्टीपल मायलोमा होतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
जर लक्षणे आणि चिन्हे मल्टीपल मायलोमाचे सूचक असतील तर, एक्स-रे, संपूर्ण रक्त गणना, मूत्र विश्लेषण, सीटी स्कॅन, पीईटी स्कॅन किंवा एमआरआय करावे लागतात. हे स्कॅन ट्यूमरचे स्थान आणि विस्तार निर्धारित करण्यात मदत करतात.
बायोप्सी मल्टीपल मायलोमाची पुष्टी करण्यासाठी एक निश्चित चाचणी आहे. अस्थिमज्जामधील कर्करोगाच्या प्लाझ्मा पेशींचे संभाव्य अस्तित्व निश्चित करण्यासाठी अस्थिमज्जाचे नमुने घेतले जातात.
किमोथेरपी मल्टीपल मायलोमासाठी सर्वात सामान्य उपचार आहे, पण त्याचे काही साइड इफेक्ट्स देखील होतात. किमोथेरपीचे औषधे कर्करोगाच्या पेशींना मारण्यासाठी आणि ट्यूमरच्या वाढ थांबविण्यासाठी वापरली जातात.
इतर औषधे देखील वापरली जातात परंतु रोग बरा करण्यासाठी नेहमीच यशस्वी होतात असे नाही किंवा त्यांचे अनेक दुष्परिणाम होतात. या औषधांमध्ये खालील समाविष्ट आहेत:
- स्टेरॉईड्स - स्टेरॉईड्स सामान्यपणे किमोथेरपी औषधे पूरक आहेत आणि त्यांना अधिक प्रभावी बनवतात. स्टेरॉईड्सचे मुख्य दुष्परिणाम हृदयात जळजळ होणे, अपचन आणि झोपेची समस्या आहे.
- थॅलिडोमाइड - थॅलिडोमाइड देखील मायलोमा पेशींचा नाश करण्यात मदत करते परंतु यामुळे बरेचदा बद्धकोष्ठता होते आणि चक्कर येतात. याशिवाय, रक्ताच्या गाठी बनतात ज्याने पायाला सूज येते, श्वास घेतांना त्रास होतो आणि छातीत दुखते
- स्टेम सेल ट्रान्सप्लंट - मायलोमाच्या अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये, निरोगी स्टेम पेशींसह खराब झालेले अस्थिमज्जा ऊतक पुनर्स्थित करण्यासाठी स्टेम सेल प्रत्यारोपण केले जाते, ज्यामुळे नवीन पेशींचा विकास होतो आणि अस्थिमज्जा ठिक करण्यास मदत होते.
हे उपचार महाग, वेदनादायक आहेत आणि उपचारांसाठी रूग्ण आणि डॉक्टरांकडून भरपूर बांधिलकी आवश्यक असते.